रविवार, ३१ मार्च, २०१३

देवेंद्र गावंडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यंदा "लोकसत्ता'चे चंद्रपूर येथील खास प्रतिन... thumbnail 1 summary

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यंदा "लोकसत्ता'चे चंद्रपूर येथील खास प्रतिनिधी देवेंद्र गावंडे यांना घोषित झाला आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार त्यांना लवकरच प्रदान केला जाईल. 

देवेंद्र गावंडे हे "लोकसत्ता'चे चंद्रपूर येथील खास प्रतिनिधी असून नक्षलवाद, आदिवासींच्या समस्या या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
न्यायालयाच्या एका तारखेसाठी आदिवासींना 600 रुपये खर्च करावे लागत असल्याच्या त्यांच्या बातमीची उच्च न्यायालयाने दखल घेतली होती. अहेरीचे न्यायालय, आईच्या उपचारासाठी भीक मागणारी मुलगी, अशा अनेक बातम्यांची राज्य सरकारने दखल घेतली होती. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, ओडिशा आदी नक्षलग्रस्त राज्यांमध्ये अभ्यास करून त्यांनी "नक्षलवादाचे आव्हान : दंडकारण्यातील अस्वस्थ वर्तमान' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकासाठी त्यांना ठाणेदार फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. या पुस्तकावर राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.
गावंडे यांच्या "लोकयात्रा : एक दैनंदिनी' या पुस्तकावर आधारित मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झाली आहे. त्यांना आतापर्यंत डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार (मुंबई मराठी पत्रकार संघ), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (राज्य सरकार) उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार (युगांतर शिक्षण संस्था, नागपूर), अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार (मानव मंदिर ट्रस्ट) आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
"टाइम्स ऑफ इंडिया'चे अंबरिश मिश्र आणि "नवशक्ती'चे सुनील घुमे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नक्षलग्रस्त भागात जिवाचा धोका पत्करून बातमीदारी करणाऱ्या या पत्रकाराला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देताना संघाला विशेष आनंद होत आहे, असे संघाचे अध्यक्ष अनिकेत जोशी आणि कार्यवाह सुरेंद्र गांगण यांनी म्हटले आहे.

Sponsor

test